Monday, June 6, 2016

आर्ची म्हणाली..

आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं
जातीचे हे अंगातून उतरेल कधी वारं ||

विशुद्ध प्रेम म्हणजे पुनवेचे चांदणे
तुझ्यामाझ्या नात्याचे अंगावरती गोंदणे
सारखी असती माणसे जातीचं कुंपण कारं
आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं ||

डोक्यात गेली जात की माणसे होती आंधळी
जीभा पडतात सैल अक्कल होई पांगळी
आपण जायचे कुठे बंद सगळी दारं
आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं ||

दारे तोडत आपण किती लांब जायचे
आपल्या छोट्या जीवाला कुठेकुठे जपायचे
रक्ताळलेले पाय त्याचे बनवेल जग न्यारं
आर्ची म्हणाली परशाला तेंव्हाच संपेल सारं.. तेेंव्हाच संपेल सारं.. ||
- शंकर पु. देव

No comments: