Monday, June 6, 2016

आर्ची म्हणाली..

आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं
जातीचे हे अंगातून उतरेल कधी वारं ||

विशुद्ध प्रेम म्हणजे पुनवेचे चांदणे
तुझ्यामाझ्या नात्याचे अंगावरती गोंदणे
सारखी असती माणसे जातीचं कुंपण कारं
आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं ||

डोक्यात गेली जात की माणसे होती आंधळी
जीभा पडतात सैल अक्कल होई पांगळी
आपण जायचे कुठे बंद सगळी दारं
आर्ची म्हणाली परशाला कधी संपेल सारं ||

दारे तोडत आपण किती लांब जायचे
आपल्या छोट्या जीवाला कुठेकुठे जपायचे
रक्ताळलेले पाय त्याचे बनवेल जग न्यारं
आर्ची म्हणाली परशाला तेंव्हाच संपेल सारं.. तेेंव्हाच संपेल सारं.. ||
- शंकर पु. देव

Sunday, May 10, 2015

गारपीट

गारपीट होत आहे शेतीस लागली आग
चुकले काय विठ्ठला कशाचा आला राग ||

वाळवंटी नाचताना तुझेच नांव ओठात
सारी देवा तुझी कृपा दोन घास हे पोटात
पाण्यासाठी वणवण कशी पेटली आग
चुकले काय विठ्ठला कशाचा आला राग ||

काळी माय देई सारे पिढ्यापिढ्यांची सेवा
चूक नाही झाली कधी सोन्याचा दिलास ठेवा
इमान राखले मोठे कुठे रे राहिला डाग
चुकले काय विठ्ठला कशाचा आला राग ||

संसाराचा ताप मोठा चुकली नाही वारी
सारा भार तुझ्यावर तूच मारी तूच तारी
तुझे पाय धरू किती पुन्हा फुलव रे बाग
चुकले काय विठ्ठला कशाचा आला राग ||
- शंकर पु. देव

Monday, April 6, 2015

लाचखोरीचे दुकान..!

लाचखोरीचे दुकान!

भले दिवस येतील असे आम्हाला वाटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||

गोडगोड भाषणे चित्रामधले चांदणे
दु:खाचे कपाळावर संपत नाही गोंदणे
ठिगळ कुठे लावावे आभाळ आहे फाटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||

झाडे तोडा रेती काढा लुटालूट आहे सुरू
कोण कुणा विचारतो रोज आता खिसे भरू
न्याय देवता अांधळी तिचे हातच छाटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||

तीनतीन महिन्यांनी होतात निवडणूका
गळ्यातगळे घालून देशाला कुणीही विका
लोकशाही छताखाली पेंढा-यांचे खाटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||

अस्मानीच्या संकटात सुलतानी कारभार
दोनवेळ भोजनाची गरिबीला मारामार
मोठे चोर झोपलेले गुंडांनी गज काटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||

देशाकडे पहायला आता त्यांना नाही वेळ
परदेशी या दौ-यांचा सुरू आहे मोठा खेळ
सत्तेचाही तमाशा डोळ्यात अासू दाटले
यांनीही लाचखोरीचे दुकान मोठे थाटले..||
- शंकर पु. देव

Wednesday, August 28, 2013

झोपलेला देश..!

सीमेवर गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll
भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पय धरा बोल त्यांचे खोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा
आपले मत पैशाने.. तोलत रहा
कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे तसे नको उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

-- शंकर देव

Monday, April 22, 2013

पंधराशे कोटींचे सुलतान..!

अकार्यक्षमता, बेजबाबदारपणा, चालढकल आणि नकारात्मक भुमिका या सध्या राजकारणाच्या अपरिहार्य गोष्टी बनलेल्या आहेत. आपल्या देशात सारासार विचार हळूहळू मव्ळत चाललेला आहे. राज्य आणि देशपातळीवर कोणताही निर्णय घेताना व्यवहारिक दृष्टीकोण न बाळगता जास्तीत जास्त निर्णय भावनिक पातळीवर घेतले जातात. प्रत्येक निर्णयामागे पक्षीय राजकारण डोकावत राहते आणि येणार्‍या निवडणूकांवर डोळा ठेऊन महत्वाच्या घोषणा केल्या जातात. जहिर केलेल्या घोषणांचा ताळेबंद मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी मांडण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जनतेला ‘फूल’ बनवण्याचा कार्यक्रम मात्र दरवर्षी कसोशीने पाळला जातो. सिंचनापासून शिक्षणापर्यंत सगळ्याच सरकारी क्षेत्रात दिवसेदिवस पहिल्या ओळीत लिहिलेले ‘सद्गुण’ दिसून येत आहेत आणि दिवसेदिवस ते वाढतच जात आहेत. जोपर्यंत ह बेजबाबदारपणा नाहिसा होत नाही तोपर्यंत आर्थिक विकास आणि महासत्ता ही स्वप्नेच ठरणार आहेत. सरकारी आकडेवारी किती फसवी असते याचे प्रत्यंतर जनतेला येण्यास आता फारसा उशीर नाही.
कोणत्याही देशाच्या आधारभूत सांगाड्यात शिक्षण या महत्वाच्या विषयाला सर्वात वरचे स्थान दिलेले असते. पण या देशात या विषयाकडे कुणीच गंभीरपणे पहात नाही. प्रत्येक गोष्टीचे जसे बाजारीकरण झालेले आहे तीच गोष्ट शिक्षणक्षेत्रातही दिसते आहे! शिक्षणाचा आता बाजार भरलेला आहे. येथे चोख, निर्भेळ माल मिळणे कठीण आहे. प्राथमिक शिक्षणाची परवड आपण पहातो, ऐकतो आनि वाचतोही आहोत. उच्चशिक्षणाचीही हालत वेगळी नाही. देशाचा विचार दूर ठेऊन केवळ महाराष्ट्राचा विचार केला तरी उच्च शिक्षणाचे काय तीन तेरा वाजलेले आहेत हे लक्षात येते. महाराष्ट्रात जी वीस-बावीस विद्यापीठे कायम चर्चेत असतात त्याशिवाय एकून किती विद्यापीठे अस्तित्वात आहेत हे भल्याभल्या शिक्षणतज्ञ्यांनापण माहित नाही. याही पलिकडे या विद्यपीठातून व त्यांच्याशी संलग्न असणार्‍या महाविद्यालयातून काय दर्जाचे शिक्षण दिले जाते हा एक मोठाच संशोधनाचा विषय आहे. अभिमत विद्यापीठांचे व बी.एड, डी. एड कॉलेजांचे जे उदंड पीक महाराष्ट्रात उगवते त्यात तण आणि गाजर, गवतच फार आहे. शिक्षणाचा बाजार हा फार मोठा किफायतशीर धंदा आहे हे राजकारणी नेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी इकडे मोर्चा वळवला. पाऊस पडो व ना पडो, अनावृष्टी होवो की अतिवृष्टी होवो या शेतीतून निवडणूकींसाठी पैसा व मते हमखास मिळतात. आणि पैसा व मते हे मुख्य पीक नेत्यांना गोड वाटते. सध्या सुरु असलेल्या शिक्षणसंस्था व त्यांचे संस्थापक याकडे नजर टाकली तर शिक्षण व्यवस्थेवर राजकारणाचा किती पगडा बसलेला आहे हे लक्षात येईल. विद्यापीठांचे अणि महाविद्यालयांचे पीक उदंड झाले आहे. संख्या वाढली पण गुणात्मक दर्जा घसरलेला आहे. महाविद्यालयातून दिले जात असलेले शिक्षण बाहेरच्या जगाशी किती बांधलेले आहे याचा विचार करण्याची आज गरज आहे. बर्‍याच कॉलेजात मुले-मुली येतात ती केवळ टाईमपास म्हणून्च येतात! बहुतांश मुली लग्नाच्या बाजारात उभे रहाण्यासाठी पदवी हवी म्हणूनच कॉलेजात येतात. हे कटू असले तरी वास्तव आहे, सत्य आहे. शिकविणार्‍यांची गुणवत्ता हाही मोठा वादाचा विषय आहे. आमचेच बारावीची परिक्षा जेमतेम पास झालेले विद्यार्थी सध्या कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम पहातायत. आता बारावी परिक्षेत पन्नास टक्क्यांच्याही कमी गुण मिळवणारे हे सध्या विद्वान प्राध्यापक म्हणून मिरवून घेत आहेत व विद्यपीठांच्या वेगवेगळ्या समित्यांवर त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ही कमी कुवतीची माणसे विद्यार्थ्यांच्या पदरात कय टाकणार..? वेगवेगळ्या ठिकाणी बारवर जसे पोलिसखाते छापे टाकते तसे कॉलेजवर विद्यापीठावर छापे टाकावेत म्हणजे आणखी मनोरंजक माहिती बाहेर येईल. ही प्राध्यापक मंडळी जेंव्हा संप करुन विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेच्या तोंडावर कोंडीत पकडतात तेंव्हा शिक्षणक्षेत्राबद्दल त्यांना किती आस्था आहे हे लक्षात येते.
सध्या प्राध्यापकांचे शोधनिबंध व पी.एच.डीची खिरापत यावर रोज नव्या नव्या बातम्या येत आहेत. नेट सेटच्या परिक्षेत फारच थोड्या जणांना यश मिळते. म्हणून या गुणवत्ता तपासणार्‍या परीक्षेविरुद्ध प्राध्यापक मंडळींनी ओरड सुरु केलेली आहे. हे विद्वान प्राध्यापक आपला नेमून दिलेला आभासक्रम पूर्ण कधीच शिकवत नाहीत. त्यामुळेच बहूतेक कॉलेज विद्यार्थी बाहेरच्या खाजगी वर्गांना जातात. शिकवणी वर्गाला पर्याय नाही ही धारणा समस्त पालक वर्गाची झालेली आहे. कॉलेजला गुणवत्ता देणार्‍या "नॅक"मधील सदस्यांची "फाईव्ह स्टार" व्यवस्था बहूतेक महाविद्यालये करत असतात. त्यांची ‘खाण्यापीण्याची’ उत्तम व्यवस्था चांगल्या हॉटेलांतून केलेली असते. खरा म्हणजे हा शोध पत्रकारीतेचा विषय आहे. त्यांनीच त्याकडे पहावे. एकूण काय,उच्च शिक्षणाची खिचडी देखील प्राथमिक शिक्षणसारखी जळकी आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या "खाऊजा" संस्कृतीची हायब्रीड फळे शिक्षणाच्या वृक्षाला आलेली आहेत. शिक्षणाचे पाणी दूरवर पसरले पण खोलवर झिरपले नाही. त्यामुळे तसा उच्चशिक्षणात दुष्काळच आहे. विद्यापीठ पातळीवर उत्पादन प्रक्रीयेसाठी गरज असलेले संशोधन फारसे होत नाही. सारे परदेशांतून आयात केलेले तंत्रज्ञान देशभरात वापरले जात आहे. जे उच्च शिक्षणक्षेत्रात शिकवतात ते संशोधन करीत नाहीत आणि जे संशोधन करतात ते शिकवत नाहीत. कॉलेज शिक्षणाचा संपूर्ण देशात एकच आकृतीबंध नाही. सिब्बल साहेबांनी सुरुवात केलेली आहे. पण त्यात यशस्वी ते होणार नाहीत. खाते बदलले की पुन्हा पहिले पाधे पंचावन्न. शरदकाका पंधराशे कोटी कोणत्या गुणवत्तेबद्दल देणार याचे उत्तर आमच्याकडे नाही. एक गोष्ट जाता जाता लक्षात घ्ययला हवी की, अशिया खंडातील दोनशे अग्रगण्य विद्यापीठांच्या नामावलीत भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव नाही यातच सारे आले..!

Monday, April 8, 2013

राज्य टग्यांचे..!

होय, हे राज्य टग्यांचे आहे
सत्तेने फुगलेल्या फुग्यांचे आहे ll

दर निवडणूकीत आम्ही भरून घेतो वारा
पाप पुण्य नीती अनिती याला नसतो थारा
जनतेचे मत बाजार विकाऊ आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे.. ll

दादागिरीवरच आमचा पोसलाय दम
कुणालाही कुठेही देऊ आम्ही दम
सत्तेच्या रथाचे चाक लाज कोडग्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे.. ll

आम्ही बोलत असता मध्येच अडवू नका
आमच्याशिवाय कुणी नवे घडवू नका
तुमचे हे आंदोलन फक्त बघ्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे.. ll

कुणीच बोलायचे नाही आमच्यापुढे जास्ती
ताबडतोब कुणाचीही आम्ही उतरवू मस्ती
जाल तिथे निशाण सोयर्‍या सग्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे.. ll-- शंकर पु. देव

Thursday, March 7, 2013

मोजलेच नाही...!

आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी
भाजता भाजता हाताला किती बसले चटके... 
                                           मोजलेच नाही..

नवर्‍यासह लेकराबाळांचे करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले... 
                                            मोजलेच नाही....

जरा चुकले की घरच्यांची बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली, काळजाला किती घरं पडली.... 
                                          मोजलेच नाही..

याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही कुणासाठी
जगता जगता माझ्यासाठी मी अशी किती जगले.. 
                                          मोजलेच नाही...

पाखरे गेली फारच दूर डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर निसटून गेले कोणते सूर... 
                                          मोजलेच नाही....
                                         - श्री. शंकर पु देव